
15 जून 2025 हैद्राबादच्या जुन्या, पडक्या घरात सापडलेल्या मानवी अवशेषांनी शहरात खळबळ उडवून दिली आहे. क्रिकेट खेळणाऱ्या काही मुलांमुळे हे धक्कादायक रहस्य उघडकीस आले.
अशी झाली ही घटना
एक जुना आणि भग्नावस्थेत असलेला बंगला, गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. याच बंगल्याजवळ काही मुले क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल बंगल्याच्या आत गेला. बॉल परत घेण्यासाठी एक मुलगा कंपाउंड वॉलवरून उडी मारून आत गेला. त्याला घराचा दरवाजा अर्धवट उघडलेला दिसला.
आत गेल्यावर त्याला विचित्र वास आला. आपल्या फोनच्या टॉर्चचा वापर करून बॉल शोधताना, त्याला जे दिसले ते पाहून तो हादरला. किचनजवळ जेवणाच्या टेबलाजवळ त्याला मानवी कवटी आणि हाडांचा सापळा दिसला. भीतीने थरथरत, त्याने त्याचा ४५ सेकंदाचा व्हिडिओ आणि काही फोटो काढले आणि मित्रांना पाठवले. लवकरच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली.
पोलीस तपास आणि अमिर खानची कथा
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमसह त्यांनी घरातील प्रत्येक कोपरा तपासला. तपासामध्ये पोलिसांना एक जुना फोन सापडला. फोन चार्ज केल्यावर त्यात ८४ मिस्ड कॉल्स दिसले. या फोनच्या मदतीने पोलिसांनी अमिर खानच्या धाकट्या भावाला, शादाब खानला संपर्क साधला. त्याने पुष्टी केली की हे अवशेष त्याचा मोठा भाऊ अमिरचे आहेत.
अमिर खान, मुनीर खानच्या दहा मुलांपैकी एक होता. त्याचे वडील २०१३ मध्ये मरण पावल्यानंतर तो घरात एकटाच राहत होता. तो अविवाहित होता. मानसिक आजारामुळे तो आपल्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून दूर राहू लागला होता. २०१५ पासून त्याच्या कुटुंबाचा त्याच्याशी संपर्क तुटला होता, पण त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती.
पोलिसांचा निष्कर्ष
घरात कोणताही संघर्ष किंवा रक्ताचे डाग सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा असा अंदाज आहे की अमिरचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिरने स्वतःला घरात कोंडून घेतले असावे आणि २०१८ च्या आसपास त्याचा आजारामुळे मृत्यू झाला असावा.
अनेक अनुत्तरीत प्रश्न उपस्थित झाले आहेत. जसे की, कुटुंबाने अमिर बेपत्ता झाल्याची तक्रार का केली नाही? इतकी वर्षे कोणीही त्याची चौकशी का केली नाही? आणि घराचा दरवाजा कसा तुटला? या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत.